लंडन (ब्रिटन) – भारतीय दूतावासाने नेदरलँड्स सरकारसह द हेग येथील प्रसिद्ध ‘शेवेनिंगेन’ जिल्ह्यातील जी-२०च्या अंतर्गत आयोजित केलेल्या समुद्रकिनार्‍याच्या स्वच्छतेचे अभियान राबवले. यांतर्गत ५ सहस्र ४१० ‘सिगारेट बट्स’ (सिगारेट ओढून झाल्यावर राहिलेला भाग), तसेच २४० किलो समुद्री कचरा गोळा करून किनार्‍याची स्वच्छता करण्यात आली. ‘जी-२० देशांचा अध्यक्ष’ म्हणून भारताचा ‘महासागरांना प्रदूषणमुक्त करणे’ हा मुख्य कार्यसूचीचा एक भाग आहे. भारताच्या पुढाकाराने उचलण्यात आलेले पाऊल हे ‘महासागरांची स्वच्छता हा जगभरात वाढलेल्या जलवायू परिवर्तनाला अटोक्यात आणण्याचा महत्त्वपूर्ण उपाय आहे’, याकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी होते.

या वेळी नेदरलँड्समधील भारताचे राजदूत रीनत संधू म्हणाले की, समुद्री कचर्‍याच्या स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून भारताने जी-२० अध्यक्षतेचे मूळ वाक्य ‘एक पृथ्वी, एक परिवार, एक भविष्य’ याचा प्रभावशाली संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.