नागांचे आध्यात्मिक महत्त्व आणि नागपंचमी

138

कश्यप ऋषी आणि कद्रू यांच्यापासून सर्व नागांची निर्मिती झाली. नागांचे प्रमुख तीन प्रकार आहेत.

तामसिक नाग

हे नाग प्रामुख्याने काळ्या रंगाचे असून ते पाताळातील नागलोकात निवास करतात. मोठ्या वाईट शक्ती या नागांचा सूक्ष्म युद्धामध्ये शत्रूवर विषप्रयोग करण्यासाठी शस्त्राप्रमाणे वापर करतात. पाताळातील नाग हे पृथ्वीवर नागांपेक्षा लक्ष पटींनी सामर्थ्यवान आणि सहस्र पटींनी विषारी असतात.

राजसिक नाग

हे नाग पृथ्वीवर वास करतात. नागयोनीमध्ये जन्म मिळाल्यामुळे या नागांचे आचरण सर्वसामान्य नागांप्रमाणे असते. ते काळे, निळसर, तपकिरी, चॉकलेटी आदी रंगांचे असतात.

सात्त्विक नाग

हे नाग दैवी असल्यामुळे ते शिवलोकाजवळील दैवी नागलोकात वास करतात. त्यांचा रंग पिवळसर असतो आणि त्यांच्या मस्तकावर लाल किंवा निळ्या रंगाचा नागमणी असतो. सात्त्विक नाग हे पाताळातील नागांच्या तुलनेत लक्ष पटींनी सामर्थ्यवान असतात. सात्त्विक नागांना विविध देवतांनी धारण केले आहे. शिवाच्या गळ्यात वासुकी असतो. गणपतीच्या पोटाला वेटोळे घातलेला जागृत विश्‍वकुंडलीनीचे प्रतीक असणारा पिवळा नाग पद्मनाभ आहे. श्रीविष्णू शेषनागाच्या शय्येवर पहुडतो. सात्त्विक नाग सिद्ध आणि ऋषिमुनी यांच्या आधीन असतात. ते त्यांच्या आज्ञेचे पालन करतात. प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या आज्ञेने साधक आणि आश्रम यांचे वाईट शक्तींच्या त्रासांपासून रक्षण करण्यासाठी सनातनच्या विविध आश्रमांभोवती सूक्ष्मातून पिवळ्या नागांचे सैन्य तैनात आहे. पिवळे नाग उच्च देवतांचे उपासक असल्यामुळे त्यांच्याकडे दैवी बळ आहे. त्यामुळे त्यांना आशीर्वाद देण्याचे, म्हणजे संकल्पानुसार कार्य करण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे.

नागपंचमी

श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला नागाची पूजा केली जाते; म्हणून या तिथीला ‘नागपंचमी’ म्हणतात.

७ अ. नागपंचमीचा इतिहास

७ अ १. कालियामर्दनाची तिथी : श्रावण शुक्ल पक्ष पंचमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने गोकुळात असतांना यमुनेच्या डोहात उडी घेऊन कालिया नागाचे मर्दन केले.

७ अ २. सर्पयज्ञाच्या सांगतेचा दिवस : या दिवशी आस्तिक ऋषींच्या सांगण्यावरून जनमेजय राजाने सर्पयज्ञ करणे थांबवले आणि आस्तिक ऋषींनी विश्‍वातील सर्व नागांना अभय दिले.

७ आ. नागाच्या पूजनाचे महत्त्व : शिवाने जेव्हा हलाहल विषाचे प्राशन केले तेव्हा त्याला साहाय्य करण्यासाठी नऊ नाग आले आणि त्यांनीही हलाहलाचा अंश प्राशन केला. त्यामुळे शिव नागांवर प्रसन्न झाले. नागांनी समस्त सृष्टीचे रक्षण करण्यासाठी दिलेल्या योगदानासाठी ‘मनुष्य नेहमी नागांप्रती कृतज्ञ राहून तो नागांची पूजा करेल’, असा आशीर्वाद नागांना दिला. तेव्हापासून नऊ नाग मनुष्याला पूजनीय झाले. नऊ नाग हे नऊ प्रकारची पवित्रके (चैतन्यलहरी) ग्रहण करणारे घटक आहेत. त्यांच्या पूजनाने चैतन्यलहरींना धारण करणार्‍या समुहाचेच पूजन होते.

७ आ १. पूजनाचा विधी : या दिवशी गारुडी लोक नाग आणतात. त्याची पूजा करून त्याला दूध देतात. घरामध्ये स्वच्छ लाकडी पाटावर गंध, हळद आणि कुंकू यांच्या मिश्रणाने पाच फण्यांचा नाग काढावा किंवा रक्तचंदनाने नऊ नागांच्या आकृत्या काढाव्यात. काही ठिकाणी मातीचा नागही बनवून त्याचे पूजन करतात. नागाची पूजा करतांना अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या नऊ नागांची नावे घेऊन गंध, अक्षता आणि फुले वाहावीत. घरातील लोकांनी फुले, दूर्वा, लाह्या, हरभरे इत्यादी पदार्थ वाहावेत.

७ आ २. पूजनाची फलप्राप्ती : नऊ नागांचे पूजन केल्यामुळे सर्पभय उरत नाही आणि विषबाधा होण्याचे संकट टळते.’

– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.७.२०१७)

नागपंचमीच्या दिवशी झोका खेळण्यामागील इतिहास

पाच युगांपूर्वी सत्येश्‍वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्येश्‍वर हा तिचा भाऊ होता. सत्येश्‍वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. सत्येश्‍वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानला. दुसर्‍या दिवशी सत्येश्‍वरीला नागराज दिसला नाही. तेव्हा ती रानात सैरावैरा भटकू लागली आणि शोधता शोधता झाडांच्या फांद्यांवर चढून पाहू लागली. त्यानंतर नागराजाने तिला दृश्य स्वरूपात समोर येऊन सत्येश्‍वराचे रूप प्रकट केले. तेव्हा ती आनंदाने झाडांच्या फांद्यांवर झोके घेऊ लागली. त्यामुळे स्त्रिया त्या दिवशी झोका खेळतात. झोका खेळण्यामागील उद्देश असतो – जसा झोका वर जातो, तसा भाऊ प्रगतीच्या शिखरावर जाऊ दे आणि झोका खाली येतो, तशा भावाच्या आयुष्यात आलेल्या सर्व अडचणी आणि दुःखे खाली जाऊ देत.

संदर्भ – सनातन संस्था www.sanatan.org